loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

माध्यमं

महत्त्वाची पत्रं

३ सप्टेंबर २०२० । श्री. राज ठाकरे ह्यांचं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना पत्र

कोरोना प्रतिबंधक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा.

प्रति,
मा.श्री. उद्धव ठाकरे,
मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य.

सस्नेह जय महाराष्ट्र.

सध्या महाविकास आघाडी सरकारचं काही बाबतीतील धोरणशैथिल्य हे फारच बुचकळ्यात टाकणारं आहे. ह्या सरकारच्या डोळ्यावर कुठल्या गुंगीची झापड आली आहे की ज्यामुळे गेले अनेक दिवस श्रद्धाळू हिंदू भाविकांचा सुरु असलेला कंठशोष सरकारच्या कानावर पडत नाहीये?
‘अनलॉक’ क्रमांक अमुक तमुक अशा ‘अनलॉक’ प्रक्रियेचे अनेक टप्पे सुरु आहेत, मॉल्स उघडले जात आहेत, सार्वजनिक कार्यक्रमातील लोकांची उपस्थिती १०० करण्याची परवानगी दिली जात आहे आणि ह्या सगळ्यात भक्तांची आणि देवांची ताटातूट सुरूच आहे. असं का? ह्या सरकारला मंदिरं उघडण्याच्या बाबतीत इतका आकस का आहे?

कोरोनामुळे जेंव्हा अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार ठप्प होते तेंव्हा मंदिरं बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयाचं आम्ही देखील समर्थन केलं होतं पण आज जेंव्हा दैनंदिन जीवन सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरु असताना नेमकं महाराष्ट्रातच देवळं का बंद ठेवली जात आहेत? जर मॉल आणि सार्वजनिक कार्यक्रमांसाठी सरकार निर्बंध शिथिल करताना काही नियमांची चौकट आखून देऊ शकते तर तशीच चौकट मंदिर प्रवेशासाठी देखील असू द्या. आणि लॉकडाऊनच्या काळात आषाढीची वारी असो, गोपाळकाल्याचा उत्सव असो की गणेशोत्सव असो राज्यातील हिंदू बांधवांनी कमालीचं सामंजस्य दाखवलं आहे, सरकारच्या आदेशांचं अत्यंत समजूतदारपणाने पालन केलं आहे त्यामुळे उद्या मंदिर उघडली तर ह्या राज्यातील माझा हिंदू बांधव आखून दिलेले नियम काटेकोरपणे पाळेल ह्याची मला खात्री आहे.

आणि मंदिरं सुरु करणं म्हणजे निव्वळ काही भक्तांच्या पुरता हा विषय मर्यादित नाही, इथे त्यात देवाची सेवा करणारे पुजारी असोत, गुरव असोत की त्या मंदिरावर अवलंबून असणारी एक छोटीशी अर्थव्यवस्था असो ह्यांचा सरकार विचार करणार आहे का नाही? मध्यंतरी माझ्याकडे त्र्यंब्यकेश्वर मंदिराचे पुजारी आले होते त्यांनी हीच व्यथा माझ्याकडे मांडली. एका मंदिरावर त्या गावाची, त्या शहराची अर्थव्यवस्था अवलंबून असते ती अर्थव्यवस्थाच जर कोलमडणार असेल तर त्यांनी साकडं घालायचं कोणाकडे?
गेले ५ महिने सगळं अर्थकारण ठप्प आहे, लोकांच्या नोकऱ्या गेलेत, व्यवसाय पार बुडालेत, त्यामुळे आतातरी सरकारने निर्बंध शिथिल करून, सार्वजनिक वाहुतकीचं नीट नियोजन करून ह्या ह्या अर्थकारणाला धुगधुगी द्यावी अशी जनतेची अपेक्षा आहे. ह्यासाठी लोकांनी सरकारकडे विनंत्या, आर्जवं केली, टाहो फोडला, पण सरकार स्वतःच्या धुंदीत तल्लीन झालंय त्यामुळे ‘देव तारी त्याला कोण मारी’ ह्या अंतिम श्रद्धेतून त्यांना त्यांच्या ईश्वराला साकडं घालायचं आहे, देवा ह्या अस्मानी, सुलतानी संकटातून सोडव असं आर्जव करायचं आहे आणि म्हणूनच सरकारने देव आणि त्याचे भक्त ह्यांची ताटातूट करण्याचा फंदात पडू नये.

त्यामुळे सरकारने मंदिरं सगळ्यात शेवट उघडून उगाच नको ते पुरोगामीत्व दाखवू नये त्यापेक्षा एक नियमावली आखावी आणि हिंदुजनांच्या मंदिर प्रवेशाचा मार्ग मोकळा करावा. पण तरीही सरकारने जर ह्या विषयी लवकरात लवकर सकारात्मक पाऊल उचललं नाही तर आम्हाला नाईलाजाने सरकारच्या आदेशांना झुगारून मंदिर प्रवेश करावा लागेल, पण मी आशा करतो की ही वेळ सरकार आमच्यावर येऊ देणार नाही.

आपला नम्र,
राज ठाकरे

। महत्त्वाची पत्रं

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.