loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

प्रमुख भूमिका

पक्षाविषयी

प्रमुख भूमिका

महाराष्ट्र राज्य, महाराष्ट्र प्रदेश आणि मराठी भाषा यांना भौतिक व सांस्कृतिक वैभव प्राप्त करून देणे हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे ध्येय आहे.

7

आमची भूमिका

मराठी माणसाच्या आणि अखंड महाराष्ट्र राज्याच्या भौतिक आणि सांस्कृतिक उत्कर्षासाठी आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेपासून प्रतिबद्ध आहोत आणि पुढेही राहू. मराठी माणूस, मराठी संस्कृती, मराठी राज्य आणि त्याचं हित हा आमचा श्वास आहे. पण हे म्हणत असताना ‘मराठी माणूस’ म्हणजे नक्की कोण ह्याविषयीची आमची आमची व्याख्या अजिबात संकुचित नाहीत. जो माणूस ह्या राज्यात जन्माला आलेला आहे, मग तो अमराठी घरात देखील जन्माला आलेला का असेना पण तो हे राज्य आपली कर्मभूमी मानतो, मराठी भाषा, मराठी संस्कृतीला आपली मानतो आणि तिच्या उत्कर्षासाठी झटायला तयार आहे, थोडक्यात महाराष्ट्र धर्माविषयी ज्याला कळकळ आहे, तो प्रत्येक माणूस हा आमच्यासाठी मराठी माणूसच आहे.

पण ‘महाराष्ट्र धर्माचं’ कसोशीने पालन करत असताना ‘हिंदवी स्वराज्याचा’ निर्धार आम्ही क्षणभरही नजरेआड केलेला नाही. करणार नाही. आणि त्यामागची अर्थातच प्रेरणा आहे ती म्हणजे महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांची. जवळपास ३५० वर्षांपूर्वी महाराजांनी हिंदवी स्वराज्याचं जे रोपटं लावलं त्या मागील विचाराचं, धारणेचं अचूक वर्णन छत्रपती संभाजी महाराजांनी बुधभूषण ह्या ग्रंथात अचूक केलं आहे.

कलिकालभुजंगमावलीढं निखिलं धर्मवेक्ष्य विक्लवं य: ।
जगत: पतिरंशतोवतापो: (तीर्ण:) स शिवछत्रपतिजयत्यजेय: ॥

धर्माचा ऱ्हास करण्याच्या उद्देशाने कालिकालरूपी भुजंगाने विळखा घातला होता अशा वेळेस ह्या भूमीला त्या विळख्यातून सोडवण्यासाठी जणू जगत्पालच ह्या भूमीवर अवतरला, त्या जगत्पालची, शिवरायांची विजयदुऺदुभी गर्जत राहू दे.

असं म्हणतात विशिष्ट काळी विशिष्ट राष्ट्राला पूर्वनियोजित कार्य करावे लागते ते त्या राष्ट्राचे अवतारकार्य असते. हिंदवी स्वराज्य हेच ह्या राष्ट्राचे अवतारकार्य आहे हे महाराजांनी जाणलं आणि तेच अवतारकार्य पुढे नेण्यावर आमचा विश्वास आहे. हिंदवी स्वराज्य म्हणजे निव्वळ हिंदूंचे राज्य असं नाही, तसा अर्थ छत्रपती शिवरायांना देखील अभिप्रेत नव्हता आणि त्यांनी कधीच अन्य धर्मियांना दुय्यम वागणूक दिली नाही की आपपरभाव केला नाही. भारतीय संस्कृती ही हिंदू संस्कृती आणि त्यात आलेल्या अनेक प्रवाहांचं मिश्रण आहे, त्यात सह्चार्याची भावना आहे, त्यामुळे ह्या संस्कृतीचा आणि सह्चार्याचा आदर करणाऱ्या अन्यधर्मीयांविषयी आम्हाला कोणताच आक्षेप नाही पण ह्या भारतीय संस्कृतीला मुजोरी आणि दंडेलशाहीच्या जोरावर जर कोणी आवाहन देण्याचा प्रयत्न करत असेल तर मात्र आम्ही त्यांना बडगा दाखवल्याशिवाय राहणार नाही. थोडक्यात महाराष्ट्र धर्म हा आमचा मूळ विचार आहे तर हिंदवी स्वराज्य हा आमचा निर्धार आहे.

| महापुरुषांच्या साक्षीने संबोधित करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

हा आग्रह का?

जेंव्हा देशातील मोठा भूभाग परकीय आक्रमकांच्या राजवटीत शतकानुशतकांच्या अंधारयुगात चाचपडत होता त्यावेळेस ह्याच सह्याद्रीच्या कड्याकपारीतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने एक सूर्य उगवला. ह्या क्रांतिसूर्याने दास्यत्वाने पिचलेल्या मनांना उभारी दिली आणि मनगटांना बळ दिलं. हिंदवी स्वराज्यासाठी लढा उभारण्याची प्रेरणा देशभर रुजवली. पुढे ह्याच मऱ्हाठेशाहीने महाराजांच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेपार नेला. देशभरातील पडझड झालेल्या धार्मिक स्थळांना पुन्हा उभारी दिली, धर्म आचरणात आणण्याची हिंमत दिली.

ह्या भूमीत शौर्य आहेच पण धर्माच्या पुनुरुत्थानाची , त्यातील बुरसटलेल्या रूढी परंपरांवर सडकून टीका करणारी आणि माणसाला माणूस म्हणून न वागवणाऱ्या जुलमी व्यवस्थेवर आसूड ओढणारी आणि भौतिक जीवनाला आध्यात्मिक अधिष्ठान देणारी थोर संतपरंपरा आहे.

ब्रिटिशांच्या विरोधातील लढा मग तो १८५७ च्या रूपाने झालेला उठाव असो, त्यानंतरच्या अनेक सशस्त्र क्रांत्या असोत की नेमस्त अथवा जहाल मार्गाने ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणाऱ्या चळवळी असोत ह्या सगळ्याचा उगम ह्याच राज्यात झाला आहे.

भारतीय जनतेत स्वराज्याची आणि राष्ट्रवादाची जाणीव निर्माण करणारे ‘लोकमान्य टिळक ह्याच भूमीतील. आधुनिक भारतातील पहिले समाजक्रांतीकारक महात्मा ज्योतिबा फुले ह्याच महाराष्ट्रातील. ज्या भारतीय समाजात ‘स्त्री’ ही निव्वळ उपभोग्य वस्तू म्हणून बघितली जात होती अशावेळेस देशभरातील स्रियांना त्यांच्या अस्तित्वाची आणि सामर्थ्याची जाणीव ज्यांनी करून दिली त्या ‘ज्ञानगंगोत्री’ सावित्रीबाई फुले देखील ह्याच महाराष्ट्रातील. फुले दाम्पत्यानंतर सत्यशोधक चळवळीला राजाश्रय मिळाला तो राजर्षी शाहू महाराजांच्या रूपात. समाज परिवर्तनाच्या अनेक प्रवाहांना शाहू महाराजांनी संघटित केलं, खमकं पाठबळ दिलं. आणि हजारो वर्षांच्या अस्पृश्यतेच्या गुलामगिरीच्या खाईत लोटल्या गेलेल्या लाखो दलित-पीडितांचे पुनुरुत्थान करणारे महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर देखील ह्याच भूमीतील. विज्ञाननिष्ठतेचा आग्रह धरणारे आणि हिंदू राष्ट्रवादाची मांडणी करणारे स्वातंत्र्यवीर सावरकर देखील ह्याच भूमीतील.

गोपाळ हरी देशमुख, न्यायमूर्ती रानडे, गोपाळ गणेश आगरकर, राजारामशास्त्री भागवत, बाळशास्त्री जांभेकर, पंडिता रमाबाई, विठ्ठल रामजी शिंदे, संत गाडगेबाबा, प्रबोधनकार ठाकरे, विनोबा भावे, साने गुरुजी, हमीद दलवाई ते कर्मवीर भाऊराव पाटील अशा थोर समाजसुधारकांची महाराष्ट्राला परंपरा आहे.

श्रीपाद अमृत डांगे, एस.एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील, बाळासाहेब ठाकरे, शरद पवार ह्यांच्या सारख्या द्रष्ट्या नेत्यांची ही भूमी आहे.

बहिणाबाई चौधरी, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर अमर शेख, आचार्य अत्रे,सरोजिनी बाबर, कुसुमाग्रज, दया पवार, नरहर कुरुंदकर, इरावतीबाई कर्वे, दुर्गाबाई भागवत, पु.ल. देशपांडे, विजय तेंडुलकर, श्रीराम लागू, निळू फुले, दादासाहेब फाळके, लता मंगेशकर, आशा भोसले ह्यांच्यासारख्या लेखक,कलावंत आणि विचारवंतांचा हा महाराष्ट्र आहे.

डॉ. विठ्ठलराव विखे पाटील, प्रा. धनंजय गाडगीळ, वालचंद हिराचंद दोशी, शंतनुराव किर्लोस्कर, जे.आर. डी. टाटा, राहुल बजाज, बी. जी. शिर्के ह्यांच्या सारख्या उद्योगमहर्षी आणि सहकार महर्षींनी ह्या मातीत उद्योगाचं आणि सहकाराचं रोपटं लावलं आहे.

उच्च शिक्षणाची गंगा ह्याच राज्यात धावली आहे. सामाजिक सलोखा असो की देशाला विचार देणं असो की हिमालयाच्या मदतीला धावून जाणारे सह्याद्रीचे शूर सैनिक असोत, अशा सर्व बाबतीत महाराष्ट्र अग्रणी राहिला आहे.

| शिवतीर्थावरून महाराष्ट्राला संबोधित करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

आजचा अग्रेसर महाराष्ट्र जो दिसत आहे तो इतक्या समृद्ध मशागतीनंतरचा महाराष्ट्र आहे, स्वातंत्र्यानंतर प्रत्येक राज्याला विकासाच्या समान संधी असताना महाराष्ट्र कायमच अग्रेसर राहिला तो ह्या समृद्ध मशागतीमुळेच. म्हणूनच ह्या परंपरेच्या पाइकांचा, इथल्या माणसाचा ह्या भूमीतील साधनांवर, संधींवर पहिला हक्क असेल असं आम्ही म्हणलं तर काय चुकलं? अर्थात पिढ्यानपिढ्या महाराष्ट्रात राहणाऱ्या अमराठी समुदायाबद्दल आमचा आक्षेप नाही आणि नसेल. आक्षेप आहे बाहेरून येणाऱ्या लोंढ्यांबद्दल, इथल्या मातीचा पोत लक्षात न घेता, इथल्या संस्कृतीचा तिळभर देखील अदमास नसलेल्या आणि ह्या सलोख्याला, संस्कृतीला नख लावणाऱ्या प्रत्येकाबद्दल आमचा आक्षेप आहे आणि त्यांच्या विरोधात आम्ही आजपर्यंत लढा उभारला आहे आणि भविष्यातही उभारू.

कवी गोविंदाग्रजांनी त्यांच्या कवितेत महाराष्ट्राचं वर्णन ‘राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा’ असं केलं आहे ते सार्थ वर्णन आहे. हा प्रदेश दऱ्याखोऱ्यांचा आहे. ह्या राज्यातील मोठा भूभाग पर्जन्यछायेखाली येतो, देशातील अनेक राज्यांना जसं बारमाही वाहणाऱ्या नद्यांचा आधार आहे, अथवा पर्जन्यवृष्टीचं वरदान आहे तसं ह्या राज्याला वरदान नाही त्यामुळे ह्या राज्यातील प्रमुख शहरांवर जेंव्हा बाहेरील लोंढ्यांचा ताण येतो तेंव्हा त्याचा पहिला फटका आसपासच्या जिल्ह्यातील पाण्याच्या स्रोतांवर पडतो हे वास्तव आहे.

आमच्या राज्यातील माता-भगिनी जेंव्हा हंडाभर पाण्यासाठी मैलोनमैल पायपीट करतात तेंव्हा कमी फक्त पाण्याची नसते तर वर म्हणल्याप्रमाणे राजकीय इच्छाशक्तीची असते. कारण राज्यातील मर्यादित जलस्रोतांवर वाढतं अवलंबित्व हे नियोजना अभावीच आहे हे वास्तव नाकारता येणार नाही. त्यामुळे लोंढ्यांविषयीचा आमचा मुद्दा हा कोणत्याही कोत्या मानसिकतेतून आलेला नाही ह्याची खात्री बाळगावी आणि आज महाराष्ट्राला जे सहन करावं लागतंय ते भविष्यात काही इतर राज्यांना देखील करावं लागणार आहे आणि त्यावेळेस आमची जशी भूमिपुत्रांविषयीची, आमच्या राज्याविषयीची जी व्यापक भूमिका आहे तशी भूमिका अथवा तशी भावना त्या राज्यांमध्ये उत्पन्न झाली तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा त्याला पाठिंबा असेल.

महाराष्ट्रात झपाट्याने होणारं शहरीकरण पाहता राज्यकर्त्यांनी प्रामुख्याने शहर नियोजनाकडे लक्ष केंद्रित करायलाच हवं म्हणूनच राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा सर्वांगीण विचार करून पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर आमचा भर असतो. २०१५ साली मुंबई शहराचा पुढील २० वर्षांचा विकास आराखडा मुंबई महापालिकेने मांडला. एखाद्या शहराचा २० वर्षांचा विकास आराखडा म्हणजे एका पिढीचं भविष्य. त्या भावी पिढीला काय पद्धतीचं आयुष्य त्या शहरात जगायला मिळणार आहे हे ठरवणारा आराखडा. त्यामुळे त्या आराखड्यात भविष्यातील जीवन पद्धतीचा वेध घेऊनच प्रत्येक बाब आखली जायला हवी, त्यासाठी लोकसहभाग आणि पारदर्शकता महत्त्वाची. ह्याच विचारातून आम्ही २०१५ साली मुंबईतील मान्यवर, ह्या शहरातील सामान्य नागरिक ह्यांच्यासमोर तज्ज्ञांच्या मार्फत हा ‘विकास आराखडा’ नक्की काय आहे, त्यात त्रुटी काय आहेत ह्याचं सादरीकरण केलं. त्यावेळेस लोकांच्या, मान्यवरांच्या प्रमुख मागण्यांचा मसुदा आम्ही सरकारला सादर केला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं राजकरण खळ्खट्याकचं असतं असं जरी मानलं जात असलं तरी तो कायमच शेवटचा पर्याय म्हणून वापरला गेला आहे अन्यथा आम्ही चर्चा, विचारमंथन हे राजकारणातील सनदशीर मार्ग देखील इतर राजकीय पक्षांच्या तुलनेत मोठ्या प्रमाणावर वापरले आहेत हे आम्ही जबाबादारीने नोंदवू इच्छितो.

“विकास घडवायचा असेल तर दूरदृष्टि हवी आणि दुरदृष्टीला जर रचनेची आणि सौंदर्याची जोड असेल तरच तो विकास चिरंतन टिकेल.” – श्री. राज ठाकरे

ह्या शहरीकरणाच्या प्रक्रियेत शहरं भकास दिसणार नाहीत आणि कोणत्याही सुविधा निर्माण करताना त्यात सौंदर्यदृष्टीचा स्पर्श असायला हवा हा आमचा आग्रह आहे. एखादं रुग्णालय बांधा, अथवा एखादी बाग अथवा एखादं वाचनालय ते भव्य असावं, त्यात सौंदर्यदृष्टी असावी आणि मुळात कोणीतही पायाभूत सुविधा निर्माण करताना ‘पर्यावरणाचा’ कमीत कमी ऱ्हास व्हावा आणि जर पर्यावरणाचा ऱ्हास होणारच असा जर तर्क पुढे येत असेल तर ह्याचा अर्थ मूलभूत नियोजनात कुठंतरी चुकतंय आणि त्याचा आधी शोध घेऊन त्यावर उत्तर शोधावं ही आमची भूमिका राहिली आहे आणि राहील.

सौंदर्याची अनुभूती निसर्गतःच सर्वांच्या ठायी असते, अर्थात तिचा पोत वेगवेगळा असू शकतो. ह्या अनुभूतीला ज्या ज्या समाजात मानवाने आपल्या प्रतिभेच्या जोरावर अलंकार चढवले आहेत त्या त्या समाजातील अनुभूती ही अभिजाततेकडे सरकल्याची उदाहरणं आहेत आणि ते समाज अधिक संवेदनशील न्यायप्रिय झाल्याचे देखील आढळलं आहे. आणि म्हणूनच राजकरणात असो, विकासात असो ह्या सौंदर्यदृष्टीसाठी आम्ही आग्रही आहोत.

ह्याच विचारशृंखलेतून २००७ साली पक्षाने महाराष्ट्र नवनिर्माण अकादमीची स्थापना केली आणि त्या अकादमीने २०१४ साली तज्ज्ञांच्या मदतीने महाराष्ट्राचा विकास आराखडा सादर केला आणि तो महाराष्ट्राला अर्पण केला. आज देखील तो विकास आराखडा http://mnsblueprint.org ह्या संकेतस्थळावर बघता येईल. स्वतंत्र भारताच्या इतिहासात एखाद्या राजकीय पक्षाने सर्वांगीण विकास आराखडा मांडण्याची घटना दुर्मिळ. पुढे नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सत्ताकाळातील विकास कामांचं जाहीर सभांमधून सादरीकरण करून आम्ही प्रचार केला. राजकारण हे विकासाभिमुख आणि विचारशील असं आमचा आग्रह आहे, आमची भूमिका आहे आणि आम्हाला सांगायला अतिशय आनंद होत आहे की ह्या बाबतीतील प्रत्येक विचार आम्ही कृतीत उतरवून दाखवला आहे आणि तो देखील निवडणुकीय यश-अपयशांचा विचार न करता.

जगाला हेवा वाटेल असा महाराष्ट्र घडवणं हे आमचं स्वप्न आहे, ध्येय आहे पण…

पर्यावरण, नैसर्गिक साधनसंपत्तीचं न्याय्य वाटप, रोजगाराच्या मुबलक संधी, शिक्षण आणि महिला सक्षमीकरण ह्या ५ परस्पर पूरक विषयांत राजकीय आणि धोरणात्मक मतैक्य झाल्याशिवाय हे शक्य नाही, आणि ह्या विषयांवर येत्या दशकात वर म्हणल्याप्रमाणे आग्रही, अभ्यासपूर्ण भूमिका मांडणं आणि सत्तेच्या काळात त्या भूमिकांना वास्तवात उतरवणं हे आमचं उद्दिष्ट असेल. आणि अर्थातच ह्या ५ क्षेत्रात अपेक्षित बदल तेंव्हाच दिसतील जेंव्हा नागरीकरणामधील महत्त्वाची समस्या होऊन बसलेल्या बाहेरील लोंढ्यांचा समग्र विचार फक्त महाराष्ट्र नवनिर्माण सेनाच नव्हे तर देशातील इतर प्रादेशिक पक्ष करतील आणि केंद्र राज्य संबंधांमध्ये ह्या विषयी आग्रही भूमिका घेतील.

ह्यातील अजून एक महत्वाचा आणि आग्रहाचा मुद्दा म्हणजे ‘अखंड महाराष्ट्र’, एक भाषा, एक संस्कृतीच्या आधारावर निर्माण झालेल्या आमच्या मराठी राज्याचे तुकडे आम्ही कदापि होऊ देणार नाही. विकासातील असमतोल हा मुद्दा पुढे करून, ह्या एका राज्याचे तुकडे पाडण्यासाठी तो मुद्दा प्रेरक ठरत असेल तर त्याला आमचा विरोध आहे. कारण विकासातील असमतोल हा त्या त्या भागातील नेतृत्वामध्ये असलेल्या अकार्यक्षमतेमुळे घडलेला असतो. त्यामुळे विकासाच्या असमतोलावर आम्ही निश्चित भूमिका घेऊ, जनआंदोलन उभं करू, पण कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्राचे तुकडे पडू देणार नाही.

ह्या सगळ्यात अजिबात कमी महत्वाचा लेखता येणार नाही असा मुद्दा म्हणजे ह्या राज्यातील बहुसंख्यांचा जो धर्म आहे त्याचा आदर योग्य राखला गेला पाहिजे, आणि कुठल्याही एका समाजाच्या राजकीय लांगूलचालनासाठी-अनुनयासाठी बहुसंख्यांकांच्या भावनांचा अनादर होता कामा नये. मुळात ह्या राज्याने धार्मिक सलोखा कायमच राखला आहे. महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या अग्निहोत्रात सर्व जाती-धर्मातील मावळे होते, मुस्लिम कुटुंबात जन्मलेल्या जैतुनबी ह्यांनी आयुष्यभर भागवत धर्माचा प्रसार केला असा हा महाराष्ट्र आहे. ह्या राज्यातील अल्पसंख्याकानी इथला प्रमुख धर्म, त्यातील परंपरा आपल्या मानल्या आहेत आहे आणि हे राज्य देखील आपलं मानलं आहे, पण बाहेरून आलेले अल्पसंख्यांक ह्याच्या विपरीत वागत आहेत, त्यांनी वेळीच सुधरावं, ह्या राज्याच्या संस्कृतीचा, इथल्या विकास धोरणांचा सन्मान करावा हे उचित.

आणि सर्वात शेवटचा म्हणजे केंद्र-राज्य संबंधांची पुनर्र्चना. वस्तू आणि सेवा करणप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर देशातील राज्यांच केंद्रावरील अवलंबित्व वाढलं आहे. महाराष्ट्रासारख्या उद्यमी राज्याचं तर ह्या अवलंबित्वामुळे अधिकच नुकसान होतं. पण हा प्रश्न फक्त आर्थिक नाही तर त्याला इतर देखील पैलू आहेत.
उदाहरणार्थ अ-हिंदी भाषिक राज्यांचा सांस्कृतिक आणि सामाजिक आकृतिबंध हा हिंदी भाषिक राज्यांच्या आकृतिबंधापेक्षा वेगळा आहे. गेल्या काही दशकांत हे अनेक वेळा जाणवलं आहे की हिंदी भाषिक पट्ट्यातील बहुमताच्या जोरावर सत्तेत आलेली सरकारं ह्या आकृतिबंधाला समजून घेण्यात कमी पडतात आणि त्यामुळे अनेक वेळेस तणावाची परिस्थिती निर्माण होते. ह्यावर एकच उपाय म्हणजे राज्यांना अधिक स्वायत्तता देणे आणि त्यासाठी राजनयिय (डिप्लोमॅटिक) बांधणी करावी लागेल ज्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि असू.

थोडक्यात महाराष्ट्राची भौतिक आणि सांस्कृतिक प्रगती हे आमचं उद्दिष्ट आहे आणि तशी प्रत्येक राज्यांना ती संधी मिळावी ह्यासाठी केंद्रातील सरकारांनी विकेंद्रीकरणाची भूमिका घ्यावी ह्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू आणि त्यासाठी उभ्या राहणाऱ्या सनदशीर आवाजांना आमचा पाठिंबा असेल. आमच्या भूमिकेचं सार पुन्हा एकदा उद्धृत करू इच्छितो, ‘विचार महाराष्ट्र धर्माचा, निर्धार हिंदवी स्वराज्याचा’.

।  पक्षाविषयी : ध्येय धोरणं

पक्षाविषयी : मुख्य कार्यकारिणी  ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.