loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

पक्षाविषयी

नागरी आंदोलनं

आंदोलनं व उपक्रम

नागरी आंदोलनं

राज्यातील वाढत्या शहरीकरणाच्या पार्श्वभूमीवर शहराचा सर्वांगीण विचार करून पायाभूत सुविधा उभ्या करण्यावर, त्यासाठी संघर्ष करण्यावर आमचा भर असतो.
7

‘टोल’धाडी विरोधात आंदोलन

भ्रष्ट राजकारणी, काही प्रशासकीय अधिकारी आणि कंत्राटदार ह्यांच्या अभद्र युतीमुळे महाराष्ट्रात जाचक ‘पथकर’ वसुली सुरु होती. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा पथकाराला विरोध नाही. परंतु ह्या पथकर वसुलीतून येणारा निधी कुठे जातो? वर्षानुवर्षे पथकर वसुली करूनही खड्डेविरहित आणि सुविधायुक्त रस्ते नागरिकांना का मिळत नाहीत? नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून ह्या रोखीच्या व्यवहारात पारदर्शकता का आणली जात नाही? हेच आमचे आक्षेप होते. परंतु दोन पथकर नाक्यांमधील अंतर, त्या संपूर्ण मार्गावर कर्मचार्‍यांना गणवेश, नागरिकांशी सौजन्यपूर्ण व्यवहार, रोज गोळा होणार्‍या रकमेचा फलक, निरीक्षक, पोलिस, मदत व तक्रार केंद्रे, स्वच्छतागृह ह्या सुविधांची वाणवा असे ‘पथकर धोरणाचे’ सर्व कायदे पायदळी तुडवले जात होते.

अनधिकृत पथकर नाके उभे करून कर वसुलीच्या नावाखाली ‘टोलधाड’ सुरू होती आणि तरीही महाराष्ट्रात कुठलाही राजकीय पक्ष ह्याविरोधात आवाज उठविण्यास तयार नव्हता. म्हणून मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरेंनी ह्या ‘टोल’धाडी विरोधात आंदोलनाची हाक दिली. महाराष्ट्र सैनिकांनी अनधिकृत पथकर नाके उध्वस्त केले. ज्या पथकर नाक्यावरील रोखीच्या व्यवहारांमध्ये साशंकता होती तिथं महाराष्ट्र सैनिकांनी अनेक दिवस उभं राहून वाहनांची, पथकर वसुलीची सर्वेक्षणं केली. त्यामुळे पथकर वसुली करणाऱ्या कंपन्यांचा गलथान कारभार जनतेसमोर आला. ह्या सर्व माहितीचे अहवाल माध्यमांमध्ये प्रकाशित केले गेले.

| ‘टोल’ आंदोलन, निदर्शनं आणि सरकारशी केलेल्या चर्चेची क्षणचित्रं 

आंदोलनाला जनतेचा पाठिंबा लाभताच ‘अनधिकृत पथकर नाके बंद होत नाहीत आणि पथकर वसुलीत पारदर्शकता येत नाही तो पर्यंत पथकर भरू नका’ असं आवाहन श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी केलं आणि असहकार आंदोलनाला सुरुवात झाली. काही पथकर नाक्यांवर खासगी पथकर कंपन्या बळाचा वापर करत होत्या तिथं महाराष्ट्र सैनिकांनी उग्र आंदोलनं केली. राजसाहेबांनी पुणे येथे एक जाहीर सभा घेऊन पथकर आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली आणि स्वतः च्या नेतृत्वात राज्यव्यापी रास्तारोको आंदोलनाची हाक दिली. अर्थात ह्या रास्तारोको आंदोलनामुळे सर्वसामान्य जनतेला त्रास होऊ म्हणून जीवनावश्यक रहदारी वगळण्यात आली. १२ फेब्रुवारी २०१४ रोजी ‘रास्ता रोको आंदोलन’ छेडण्यात आलं. स्वतः राजसाहेबांनी ह्या आंदोलनाचं नेतृत्व केलं. आंदोलनाचं लोण राज्यभर पसरत गेलं, जनतेचा रोष ओढवू नये म्हणून सरकारतर्फे ह्या पथकर प्रश्नी तोडगा काढण्यासाठी चर्चेचं निमंत्रण आलं.

राजसाहेबांनी ते स्वीकारलं. ह्या बैठकीत राजसाहेबांनी शिष्टमंडळात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे पथकर अभ्यासक तसंच अनेक वृत्तवाहिन्यांचे मुख्य संपादक ह्यांना समाविष्ट केलं. ‘कोणत्याही पथप्रकल्पातील नफा पकडून जर अधिक रक्कम पथकरातून गोळा झाली असेल तर तेथे पथकर वसुली बंद करण्यात यावी तसंच अनधिकृत पथकर नाके बंद करण्यात यावेत. पथकर वसुलीत नवतंत्रज्ञानाचा अवलंब करून पथकर वसुली करण्यात यावी.’ ह्या मागण्या शिष्टमंडळामार्फत ठेवण्यात आल्या. सरकारतर्फे सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आणि कालांतराने ‘महाराष्ट्रातील ६५ टोलनाके आम्ही बंद करत आहोत’ हे तत्कालीन सार्वजनिक बांधकाम मंत्री ह्यांनी विधानसभेत जाहीर केलं. हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या आंदोलनाचा विजय होता.

पथकरण धोरणात जास्तीत जास्त पारदर्शकता आणण्यासाठी आतापावेतो जी धोरणं आली त्यातील त्रुटींचा अभ्यास करुन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने नवीन जनताभिमुख पथकर धोरण महाराष्ट्राच्या विकास आराखड्याच्या माध्यमातून मांडलं.

खड्डेविरहित रस्त्यांसाठीचा संघर्ष

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या १९ मार्च २००६ च्या पहिल्याच जाहीर सभेत मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे ह्यांनी भ्रष्ट कंत्राटदारांच्या निकृष्ट दर्जाच्या रस्ते कामांवर नाराजी व्यक्त केली होती. ज्या कंत्राटदारांना हजारो कोटींची कंत्राटं देऊन शहरांत-राज्यात रस्ते बांधले जातात त्याच रस्त्यांवर काही महिन्यांत खड्डे कसे पडतात? आणि त्यावर कहर म्हणजे तात्काळ खड्डे बुजवायची पुन्हा कोट्यवधींची कंत्राटं काढली जातात. ही सर्व भ्रष्ट व्यवस्था उध्वस्त करणं गरजेचं होतं किंबहुना आहे. पक्षस्थापनेनंतर काही कालावधीतच खड्डेविरहित रस्त्यांसाठी विविध शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी आंदोलनं सुरु केली. कंत्राटदारांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला. आक्रमक आणि कल्पक आंदोलनांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं ह्या संपूर्ण भ्रष्ट व्यवस्थेला जेरीस आणलं. स्वतः राजसाहेबांनी अनेक नामांकित कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी ह्या कंत्राटी पद्धतीबद्दल, निकषांबद्दल चर्चा केली तेव्हा एक धक्कादायक वास्तव समोर आलं होतं. महाराष्ट्रात काही कंत्राटदारांचं आणि भ्रष्ट व्यवस्थेतील काही घटकांचं साटंलोटं आहे. त्यामुळे कंत्राटांचे निकष बनवतानाच असे बनवले जातात की, ह्या भ्रष्ट कंत्राटदारांना रस्त्यांची कामं मिळतील आणि जागतिक कंपन्या किंवा उत्तम दर्जाची कामं करणाऱ्या कंपन्या स्पर्धेबाहेर ढकलल्या जातील.

| खड्डेविरहित रस्ते असायला हवेत ह्यासाठी महाराष्ट्र सैनिकांनी वेळोवेळी महापालिका प्रशासनाला धारेवर धरलं.

२०१२ ते २०१७ हा पंचवार्षिक कालावधीत मुंबई महानगरपालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा २८ नगरसेवकांचा गट होता. तत्कालीन मनसे गटनेते-नगरसेवक श्री. संदीप देशपांडे ह्यांनी रस्ते घोटाळ्यातील सर्व भ्रष्टाचार बाहेर काढला. कंत्राटं कशी मिळवली जातात? कंत्राट मिळाळ्यानंतर निकृष्ट दर्जाचं साहित्य कसं आणि का वापरलं जातं? ठराविक ६-७ कंत्राटदारांनाच रस्त्यांची कंत्राटं कशी मिळतात? प्रशासनातून ह्या भ्रष्ट व्यवस्थेला कसं खतपाणी घातलं जातं? अशा सर्व प्रश्नांची उत्तरं देत पक्षातर्फे गटनेते-नगरसेवक श्री. संदीप देशपांडे ह्यांनी तांत्रिक बाजू जनतेसमोर आणली. ह्यादरम्यान एका प्रशासकीय अधिकाऱ्यांना खड्डेमय रस्त्यांबद्दल जबाबदार धरलं म्हणून तत्कालीन मनसे नगरसेवक श्री. संदीप देशपांडे, श्री. संतोष धुरी ह्यांना अटक झाली. नवी मुंबई शहराध्यक्ष श्री. गजानन काळे व महाराष्ट्र सैनिकांनी पनवेल-शीव महामार्गावरील केलेल्या आंदोलनाची दखल विधानसभा अधिवेशनात घेण्यात आली. ठाण्यात जिल्हाध्यक्ष श्री. अविनाश जाधव ह्यांनी वारंवार ठाण्यातील रस्त्यांवर प्रश्न उपस्थित केले, ठाणे मनविसे जिल्हाध्यक्ष श्री. संदीप पाचंगे ह्यांनी खड्ड्यांवरच बांधकाम मंत्र्यांची चित्रं काढून प्रभावी आंदोलन केलं आणि त्याबद्दल अनेक महाराष्ट्र सैनिकांवर खटले भरले गेले पण ज्या खड्ड्यांमुळे आजतागायत असंख्य नाहक बळी गेले त्याबद्दल कंत्राटदार आणि भ्रष्ट व्यवस्थेतील कुणावरही कारवाईची एवढी तत्परता दाखवली गेली नाही.

अर्थात जिथं आंदोलनं झाली तिथले रस्ते मात्र आंदोलनानंतर दुरुस्त झाले पण शहरव्यापी हा बदल आजही जाणवत नाही. त्यासाठी राज्यकर्त्यांची इच्छाशक्ती दांडगी लागते. जी जबाबदारी नाशिक महापालिकेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असताना श्री. राजसाहेब ठाकरे ह्यांनी निभावून दाखवली. शहरांत फक्त ५ वर्षात खड्डेविरहित रस्ते तर दिलेच पण ५१० किमीचे शहरांतर्गत रस्तेही बांधले. वर्ष २०१२ तें २०१७ ह्या कालावधीत नाशिक महापालिकेवर एकही भ्रष्टाचाराचा आरोप नाही.

ढिसाळ आरोग्य व्यवस्था

महापालिकांतील औषध घोटाळा असो किंवा सरकारी रुग्णालयातील निर्ढावलेलं प्रशासन असो महानगरांमधील आरोग्यव्यवस्थेतील त्रुटी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सातत्याने प्रकाशझोतात आणल्या. सरकारी रुग्णालय सुविधायुक्त असायलाच हवं, अशी राजसाहेबांनी आग्रही भूमिका आहे.

ताजं उदाहरण मुंबईतील वाडिया रुग्णालयाचंच आहे. अतिशय माफक दरात उपचार करणारी वाडिया सारखी सरकारी रुग्णालयं थकीत अनुदानाअभावी बंद होणार असतील तर सर्वसामान्यांना परवडणाऱ्या किमतीत उपचार कुठे मिळणार? म्हणू जेव्हा अनुदानाअभावी वाडिया रुग्णालय बंद करण्यात येत होतं तेव्हा मनसे नेत्यांनी आणि सौ. शर्मिला राज ठाकरे ह्यांनी महाराष्ट्राच्या अर्थमंत्र्यांची भेट घेतली आणि रुग्णालयासाठी ४६ कोटी रु.चा निधी राज्यसरकार आणि महापालिकेमार्फत देण्यात आला.

| सौ. शर्मिला राज ठाकरे आणि मनसे नेते श्री. बाळा नांदगावकर ह्यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री श्री. अजित पवार ह्यांच्याशी बंद होणाऱ्या मुंबईतील रुग्णालयांबद्दल चर्चा केली. 

आरोग्य व्यवस्थेत शासनाने विशेष लक्ष देणं ही काळाची गरज आहे, हे वेळोवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेने आग्रहाने मांडत राहिली. त्याचीच अनुभूती कोरोनाची महासाथ आल्यानंतर महानगरांना आली. कारण कोरोनाचा प्रसार हा अतितीव्रतेने महानगरांना बसला आणि आरोग्य व्यवस्था सक्षम नसल्याने नागरिकांना प्रचंड त्रासाला सामोरं जावं लागलं.

वाढत्या शहरीकरणासह
शहर नियोजनावर प्रामुख्याने लक्ष केंद्रीत करायला हवं!

शहर नियोजन अथवा अन्य नागरी प्रश्नांवर आपल्या काही कल्पना किंवा योजना असतील तर जरूर कळवा.

शहर नियोजनाबाबतची जागृती

मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा २०१४-२०३४ सरकारने जनतेसमोर ठेवला. तेव्हा त्यातील तरतुदी पाहून मुंबईकरांना आश्चर्याचा धक्काच बसला. मुंबईची दुर्दशा जी व्हायची होती ती झाली, आता पुरे. या पुढे मुंबईच्या विकासात नागरिकांच्या मतांचा विचार व्हायलाच हवा, आणि याकरता आपण सगळ्यांनी मुंबई विकास आराखड्यातील त्रुटींना ठाम विरोध केला पाहिजे अशी आग्रही भूमिका आमीर खान, सलमान खान, फरहान अख्तर, रितेश देशमुख,ज्येष्ठ पटकथा लेखक सलीम खान, ज्येष्ठ पटकथा लेखक, गीतकार आणि खासदार जावेद अख्तर, भरत दाभोळकर तसंच मराठी चित्रपट सृष्टीतील सुनील बर्वे,उपेंद्र लिमये,जितेंद्र जोशी, वंदना गुप्ते, केदार शिंदे,महेश मांजरेकर, उपेंद्र लिमये, भरत जाधव मनवा नाईक, कौशल इनामदार उद्योगपती विठ्ठल कामत आणि अनेक ज्येष्ठ पत्रकारांनी मांडली. निमित्त होतं राजसाहेब ठाकरे यांनी आयोजित केलेल्या मुंबई विकास आराखड्यावरील परिसंवादाच.

| मुंबई शहर आराखड्यावर राजसाहेबांनी भरवलेल्या परिसंवादातील क्षणचित्र.

मुंबईत प्रत्येकाला परवडणाऱ्या किमतीत हक्काचं घर मिळेल का? शहरात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सुखाने जाता येईल का, की रस्त्यावर चालणं मुश्किल होईल? शहराच्या मध्यभागातलं जंगल टिकेल का विकासाच्या नादात अजून २० वर्षांनी या शहरात एकही झाड सापडणार नाही? अश्या अनेक प्रश्नांची उत्तर शोधण्याकरता मुंबईचा प्रस्तावित विकास आराखडा समजून घेणं आवश्यक आहे म्हणूनच मा.राजसाहेब ठाकरे यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहात एक परिसंवाद आयोजित केला होता. हा कार्यक्रम अराजकीय होता. या परिसंवादात प्रख्यात वास्तूरचनाकार पी.के.दास यांनी विकास आराखड्यातील त्रुटी समोर आणल्या. वाईल्डलाईफ फोटोग्राफर नयन खानोलकर आणि त्यांच्या टीम मधील राजेश सानप आणि झीशान मिर्झा यांनी, आरे कॉलनीतील प्रस्तावित मेट्रो ३ चा कारशेड व्हावा आणि जायका या जपानी बँकेकडून कर्ज मिळावं या करता सरकारने काय काय गोष्टी लपवल्यात याची एक यादीच सादर केली.

ह्या आणि अश्या अनेक मुद्द्यांच्या प्रेझेंटेशन नंतर सभागृहातील उपस्थित मान्यवर आणि नागरिक काही काळ सुन्न झाले. जाताना प्रत्येकाने एकंच निर्धार केला की हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचलं पाहिजे आणि आपली मुंबई सुंदर झाली पाहिजे. इथे छान जगता आलंच पाहिजे, मोकळा श्वास घेता आला पाहिजे. ह्यानंतर मुंबईत सर्वत्र महाराष्ट्र सैनिकांनी विकास आराखड्यातील त्रुटी मुंबईकरांपर्यंत पोहोचवल्या. मुंबईकरांनी कडाडून विरोध केला आणि अखेर हा विकास आराखडा रद्दबातल ठरवून आराखड्याची पुनर्रचना करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुंबई महापालिकेला दिले.

ह्यानंतर ठाणे, पुणे, नाशिक अशा सर्व शहरांमध्ये महाराष्ट्र सैनिकांनी त्या त्या शहराच्या विकास आराखड्याबाबत जागृती निर्माण केली. तज्ञांमार्फत त्यातील महत्त्वाच्या बाबी नागरिकांना समजावून नागरिकांना विकास आराखड्याबाबतच्या सूचना, हरकती नोंदवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिलं.

रेल्वे प्रवाशांच्या समस्या

मनसे नेते श्री. अमित ठाकरे ह्यांनी शिष्टमंडळासह रेल्वेच्या महाव्यवस्थापकांची भेट घेऊन रेल्वे प्रवाशांच्या प्रश्नांविषयी सुस्त आणि निष्क्रिय झालेल्या प्रशासनाला जागं केलं. गाड्यांची अनियमिततेपासून ते गाड्या अचानक रद्द होणे, फलाटांवरील गर्दीचं व्यवस्थापन, स्वच्छता ते महिला प्रवाशांची सुरक्षितता अशा अनेक विषयांवर त्यांनी मुंबईकरांचा आवाज पोहचवला.

| मनसे नेते श्री. अमित ठाकरे हत्यांच्या नेतृत्वात पक्षाचे शिष्ठमंडळ पश्चिम रेल्वे महाव्यवस्थापकीय प्रशासनाला भेटले.

त्यानंतर मुंबई व लगतच्या गर्दीच्या रेल्वे फलाटावर रेल्वे सुरक्षा दलाचे कर्मचारी गर्दी व्यवस्थापनासाठी नियुक्त करण्यात आले तसंच गरोदर महिलांना दिव्यांग प्रवासी डब्यातून प्रवास करण्याची मुभा देण्याचा निर्णय रेल्वेने घेतला. या निर्णयामुळे गरोदर महिलांना मोठा दिलासा मिळाला.

नागरी समस्या आणि #मनसेदणका

निम्म्या पुणे शहरांत अपुऱ्या पाणी पुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने महापालिकेत ठिय्या आंदोलन केलं, विविध कल्पक आंदोलनं केली अशा सर्व सनदशीर मार्गांनी पाठपुरावा केला परंतु प्रशासन ढिम्म होतं मग सिंचन भवनातच आंदोलन पुकारलं. तेच कचरा प्रश्नी… पुण्यात आणि संभाजीनगर येथे कचऱ्याचा समस्येने भीषण स्वरूप धारण केलं होतं. रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग लागले होते. त्यावेळेस महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पुण्यातील श्री. वसंत मोरे आणि श्री. राजेंद्र वागस्कर ह्यांनी त्याच्याच प्रभागात राबविलेल्या ‘शून्य कचरा : प्रभागातील कचऱ्यावर प्रभागातच प्रक्रिया’ ह्या योजनेचं सर्वत्र चर्चा सुरु होती.

| विविध नागरी समस्यांविरुद्ध #मनसेदणका  

ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पनवेल, वसई-विरार, मीरा-भाईंदर, भिवंडी, उल्हासनगर, मालेगाव, जळगाव, धुळे, परभणी, सोलापूर, अहमदनगर, अमरावती, अकोला अशा सर्व महापालिकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्वेषाने नागरी प्रश्नांच्या सोडवण्यासाठी आग्रही असते.

शिक्षक आंदोलन

आझाद मैदानात आलेले हजारो शिक्षक त्यांच्या मागण्यांसाठी दोन आठवडे आंदोलन करत होते. आंदोलकांच्या भावना इतक्या तीव्र होत्या की त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता. तडक मनसे नेते अमित ठाकरे आंदोलनस्थळी पोहचले. आंदोलकांशी संवाद साधला. “प्रश्न मार्गी लागेपर्यंत महाराष्ट्र नवनिर्माण सेना तुमच्या पाठीशी ठाम उभी आहे अशी ग्वाही आंदोलकांना दिली.” त्यानंतर तातडीने राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षाताई गायकवाड ह्यांची भेट घेतली. शिक्षण मंत्र्यांनी प्रश्न सोडविण्याचं आश्वस्त केलं.

| ३३ हजार १५४ शिक्षकांच्या वाढीव वेतनाचा प्रश्न मार्गी लागला

अखेर आता ३३ हजार १५४ शिक्षकांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी मान्य झाली. शिक्षकांच्या २० टक्के वाढीव अनुदानाचा मार्ग मोकळा झाला. शासन निर्णयानुसार, ‘घोषित’ शाळांना २० टक्के अनुदान आणि २० टक्के अनुदानित शिक्षकांना ४० टक्के अनुदान! म्हणजेच, ज्या शिक्षकांना आजपर्यंत ‘शासकीय वेतन’ मिळत नव्हतं, त्यांना यापुढे १०-११ हजार रुपये मासिक वेतन सुरू होणार आणि ज्या शिक्षकांना आधीपासून सुमारे १०-११ हजार रुपये मासिक ‘शासकीय वेतन’ मिळत होतं, त्यांना आता २०-२२ हजार रुपये मासिक वेतन मिळणार.

| आंदोलनं व उपक्रम : विकासाचं सादरीकरण

 आंदोलनं व उपक्रम : महामोर्चा |

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.