loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना

आंदोलनं व उपक्रम

विकासाचं सादरीकरण

राजसाहेबांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या स्थापनेच्या सभेत जाहीर केलं होतं की, मला आजवर महाराष्ट्रात केलं गेलेलं पारंपरिक राजकारण करायचं नाही. मला काही नवीन घडवायचं आहे, जगात जे जे उत्तम-उदात्त सर्वत्र आहे ते ते मला महाराष्ट्रात आणायचं आहे.

7

आंदोलनं व उपक्रम

विकासाचं सादरीकरण

‘राज’कीय पथ्य

आजवरचा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची वाटचाल पाहिली तर प्रत्येक टप्प्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अभिनव उपक्रम राबवले. कधीही संधीसाधू राजकारण न करता राजकीय पथ्य पाळली. जेव्हा कोणत्याही मतदारसंघात निवडून आलेल्या लोकप्रतिनिधीचं अकाली निधन होतं तेव्हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्या मतदारसंघात निवडणूक लढवत नाही. ह्याचं कारण निवडणुकीत जनतेने ज्या पक्षासाठी कौल दिला तो ५ वर्षांसाठीचा असतो. तिथल्या लोकप्रतिनिधीच्या निधनाच्या पश्चात राजकीय ताकद वाढविण्यासाठी पोटनिवडणूक लढणं संयुक्तिक नाही, ५ वर्षांनंतर जेव्हा सार्वत्रिक निवडणूक घोषित होईल तेव्हा निवडणुकीला सामोरं जायचं, अशी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सुस्पष्ट भूमिका आहे.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

अजून एक उदाहरण देता येईल ते महाराष्ट्र सैनिकांच्या प्रशिक्षण उपक्रमाचं. लोकप्रतिनिधी म्हणून निवडून जाणारा महाराष्ट्र सैनिक प्रशिक्षित असावा ह्यासाठी पक्षामार्फत वेळोवेळी मार्गदर्शन शिबिरं, मेळावे, तज्ज्ञांचे अभ्यासवर्ग आयोजित केले जात होतेच परंतु पक्ष स्थापनेनंतर विविध क्षेत्रातील, विविध स्तरावरील महाराष्ट्र सैनिक महाराष्ट्र्र नवनिर्माण सेनेत आले. ज्यांना निवडणूक लढवावीशी वाटते, त्यांना त्या सदनाची, तिथल्या कार्यशैलीची, कारभाराची संपूर्ण माहिती मिळावी ह्यासाठी इच्छुक उमेदवारांची परीक्षा घेण्यात आली. सर्व नव्या दम्याच्या कार्यकर्त्यांना स्थानिक स्वराज्य संस्थांची ओळख व्हावी हाच त्यामागचा हेतू. परीक्षा सर्वांसाठी खुली असल्याकारणाने असंख्य इच्छुकांनी सहभाग नोंदवला, त्यानंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकारी आणि राजसाहेबांनी त्यात उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. हे सर्व निकष व उमेदवाराचं जनसंपर्काचं कौशल्य पाहून २०१२ सालच्या महानगरपालिकेच्या निवडणुकीत महाराष्ट्र सैनिकांना उमेदवारी देण्यात आली.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला त्या निवडणुकीत घवघवीत यश मिळालं, निवडून आलेले नगरसेवक नवखे असले तरी त्यांनी पहिल्या ५ वर्षात सर्व महापालिकांमध्ये चोख कामगिरी बजावली. त्यानंतर प्रत्येक महापालिकांमध्ये पक्षाला कार्यालय मिळालं. महाराष्ट्र सैनिकांना ह्या स्थानिक स्वराज्य संस्थांचा कारभार प्रत्यक्षात पाहता आला, कार्यशैली अवगत होऊ लागली. परंतु अगदी नव्या पक्षातील नव्या कार्यकर्त्याला हा उपक्रम वरदान ठरला.

विकास आराखड्याचं सादरीकरण

ज्या समाजाला हजारो वर्षांचा इतिहास आहे, ज्या समाजाची एक वैभवशाली परंपरा आहे, त्या समाजानं पुढे कुठल्या दिशेनं जावं? त्या समाजानं काय आकांक्षा धरावी? आपल्या विकासाचा मार्ग काय आणि कसा निवडावा ही गोष्ट काही दोन-चार महिन्यांची किंवा पाच-सात जणांनी बसून नुसती लिहून काढण्याची नाही. त्यासाठी खूप फिरावं लागणार होतं. खूप पुस्तकं, अहवाल, शोध-निबंध पहावे लागणार होते. महाराष्ट्रात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारी मोठमोठी माणसं आहेत, संस्था आहेत, त्यांना भेटणं, त्यांचं ऐकून घेणं याची गरज होती. कुठल्याही संशोधनाला एक शिस्त असावी लागते, एक शास्त्रीय पद्धत बसवून त्याप्रमाणे काम करावं लागतं.

आम्ही हे सगळं गेल्या काही वर्षांत केलं आणि त्या अभ्यासातून आम्ही ज्या गोष्टी समजलो आणि महाराष्ट्राला जे करण्याची आज नितांत आवश्यकता आहे असं आम्हाला त्यातून वाटलं तो महाराष्ट्राचा विकास आराखडा राजसाहेबांनी २५ सप्टेंबर २०१४ रोजी महाराष्ट्राच्या जनतेसमोर अत्यंत नम्रपणे, विस्तृत सादरीकरण करून ठेवला.

| ‘महाराष्ट्र विकास आराखड्या’च्या सादरीकरणा प्रसंगीच्या चित्रफिती

महाराष्ट्रातील जनतेनं त्याचा स्वीकार करावा, त्यावर आपल्या सूचना द्याव्यात आणि आपण सर्वांनी मिळून महाराष्ट्राला प्रगतीच्या एका शिखरावर नेऊन ठेवावं एवढीच आमची प्रामाणिक इच्छा आहे. ज्या एका महान माणसानं आम्हाला आमची ओळख दिली, आम्हाला आम्ही कोण आहोत हे सांगितलं आणि आम्ही का जगायचं याचा मंत्र दिला त्या आपल्या सर्वांच्या छत्रपती शिवाजी महाराजांना आणि त्यांच्याबरोबरच ज्यांनी हा महाराष्ट्र घडवला त्या संत-समाजसुधारकांना हा “महाराष्ट्राचा विकास आराखडा” महाराष्ट्र नवनिर्माण सेना अत्यंत आदरपूर्वक अर्पण करीत आहे.

जगाला हेवा वाटेल
असा महाराष्ट्र घडवूया !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत विकास कल्पनांचं, कल्पक सूचनांचं स्वागत असतं.

विकासकामांचं सादरीकरण

२०१२ च्या महापालिका निवडणुकांमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने मुंबई, पुणे, ठाणे अशा महानगरांमध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आणि नाशिकमध्ये तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने सत्ता प्रस्थापित केली. फक्त सत्ता राबवून शहर बकाल करणाऱ्या राज्यकर्त्यांना कंटाळून नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला संधी दिली आणि राजसाहेबांनी त्या ५ वर्षात दिलेल्या संधीचं सोनं केलं.

| शिवप्रतिमेस पुष्पहार अर्पण करताना मनसे अध्यक्ष श्री. राज ठाकरे

२०-२० सत्ता राबवूनही आपण शहरासाठी काय काम करतो आहोत, कोणते प्रकल्प राबवतो आहोत ह्याबद्दल सत्ताधारी राजकीय पक्ष एक चकार शब्द काढत नाहीत मात्र नाशिकमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता येऊन केवळ ३० महिनेच झाल्यानंतर विकासकामांची सद्यस्थिती काय आहे? कोणते प्रकल्प प्रगतीपथावर आहेत? ते पूर्णत्वास कधी येतील? शहराच्या दृष्टीने दीर्घकालीन नियोजन कसं सुरु आहे? ह्याची इत्यंभूत माहिती राजसाहेबांनी दृश्य स्वरूपात मोठ्या पडद्यावर कल्याण-डोंबिवलीच्या निवडणुकीच्या जाहीर सभेत सादरीकरण करून मांडली. ज्या निवडणुका फक्त आरोप-प्रत्यारोप, चिखलफ़ेक ह्यासाठी ओळखल्या जात होत्या त्या निवडणुकांमध्ये राजसाहेबांनी विकास कामांचं जाहीर सभेत सादरीकरण करून ह्या देशात नवा पायंडा पाडला.

त्यांनतर नाशिक महापालिकेच्या सत्तेची ५ वर्ष पूर्ण झाल्यानंतर राजसाहेबांनी ५१० कि.मी.ची रस्तेबांधणी, ४० वर्ष नाशिक शहराला पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही अशी मुकणे धरण पाणीपुरवठा योजना, घनकचरा व्यवस्थापन, खतनिर्मिती प्रकल्प, जलशुद्धीकरण प्रकल्प, गोदापार्क, विद्यार्थ्यांना वाहतुकीचं शिक्षण देणारं उद्यान, शस्त्र संग्रहालय, वनौषधी उद्यान, नागरिकांना महापालिकेशी थेट संपर्क साधता यावा ह्यासाठी स्मार्ट नाशिक यंत्रणा अशा सर्व विकासकामांच सादरीकरण पुन्हा जाहीर सभांमधून सुरु ठेवलं. रतन टाटा, बाबासाहेब पुरंदरे, अनेक तज्ञ, कलावंत ह्यांनी नाशिकच्या विकासकामांबद्दल समाधान व्यक्त करत गौरवोद्गार काढले होते.

उमदं ‘राज’कारण

शहर-राज्य घडवणं हा माझ्या आवडीचा विषय आहे, हे राजसाहेब आत्मविश्वासाने सांगत असतात. त्याचीच प्रचिती त्यांच्या राजकारणातही येते. एखाद्या शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता असो वा नसो, प्रगतीच्या आड यायचं नाही, विरोधाला विरोध करायचा नाही उलटपक्षी आपल्याच प्रगतीच्या कल्पना सत्ताधाऱ्यांसमोर मांडण्यामध्ये राजसाहेबांना कधीही कमीपणा वाटत नाही, हे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उमद्या विचारसरणीचं द्योतक आहे.

नाशिकमध्ये महापालिकेच्या सत्ताकाळात राजसाहेबांनी जसा ‘गोदावरी’ नदीपात्रात गोदापार्कचा विकास केला, त्या धर्तीवर पुण्यातील मुळा-मुठा नदीपात्रातील ‘बालगंधर्व ते म्हात्रे पूल’ या टप्प्याचा उत्कृष्ट विकास कसा होऊ शकतो याचं सादरीकरण महाराष्ट्र नवनिर्माण सेना सत्तेत नसतानाही राजसाहेबांनी पुणे महापालिकेतील प्रमुख पदाधिकारी, महापौर आणि पालकमंत्री यांना केलं. अनेक शहरांच्या आयुक्तांना राजसाहेब जेव्हा भेटतात तेव्हा पक्षाने शहराच्या प्रगतीच्या दृष्टीने आखलेला आराखडा अधिकाऱ्यांसमोर मांडतात, प्रशासनाला सूचना करतात.

। आंदोलनं व उपक्रम : भूमिपुत्रांसाठी रोजगार 

आंदोलनं व उपक्रम : नागरी आंदोलनं ।

शेअर करा

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.