loader image
Select Page

माध्यमं

०९ जुलै २००८ । श्री. राज ठाकरे ह्यांचं पत्रं

मुंबईसहित सर्व महाराष्ट्रामध्ये खाजगी शाळा चालवणार्‍या सर्व संस्थाचालकांना पत्र

माझा प्रेमाचा जय महाराष्ट्र!

माझं हे पत्र खरंतर आपल्याला नीट कळावं म्हणून मी मराठीत लिहीत आहे. कारण मी जो विषय आपल्याला लिहीणार आहे, त्याची सुरुवात आपणापासूनच व्हायला हवी खरं तर. आपली शाळा महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्र राज्याची राजभाषा ही मराठी आहे. आपल्या शाळेमध्ये अनिवार्य विषय म्हणून पहिली ते दहावी (किंवा समकक्ष ग्रेडनुसार) मराठी भाषा जर शिकवली जात असेल, तर सर्वप्रथम मी आपले अभिनंदन करतो. पण जर आपल्याला शाळेमध्ये मराठी विषय अनिवार्य (पहिली ते दहावी) नसेल किंवा अधिक वाईट म्हणजे बिलकुल शिकवला जात नसेल तर ते अत्यंत गंभीर आणि महाराष्ट्रविरोधी आहे. कदाचित आजवर या गोष्टीची आपल्याला कुणी कल्पना दिली नसेल, म्हणूनच मी आपणास या गोष्टीची कल्पना देऊ इच्छितो की, महाराष्ट्राच्या भूमीवर जे जे काही उभं राहतं, त्यासाठी महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेली नैसर्गिक साधनसंपत्ती खर्च होते. आपल्या संस्थेला मिळणारी वीज, पाणी व इतर संसाधनं ही महाराष्ट्र राज्याच्या वाट्याला आलेला हिश्श्याचा भाग आहे. अशा वेळी आपली संस्था महाराष्ट्राच्या राजभाषेला (म्हणजेच मराठीला) अभ्यासक्रमात अनिवार्य न करता जर अभ्यासक्रम चालवत असेल, तर मला त्याविरुद्ध उग्र आंदोलन उभं करावं लागेल. ज्या राज्याची राजभाषा पहिलीपासून अनिवार्य म्हणून ज्या शिक्षण संस्थेत शिकवली जात नाही, त्या संस्थेला त्या राज्याकडून वीज, पाणी, जमीन व इतर नैसर्गिक संसाधन प्राप्त करण्याचा कोणताही अधिकार प्राप्त होत नाही.

आपली शाळा सी.बी.एस.ई., आय.सी.एस.ई. किंवा आय.जी.सी.एस.ई. वैगरे कुठल्याही राष्ट्रीय वा आंतरराष्ट्रीय अभ्यासक्रमांशी संबंधित असेल, तरीही आपण मराठी भाषा महाराष्ट्रात शिक्षणक्रमात अनिवार्य करण्याला अपवाद ठरत नाही! मग आपण आपल्या शाळेत फ्रेंच शिकवा, जर्मन शिकवा, इंग्रजी अनिवार्य करा. परंतु मराठी भाषेला आपणाला पर्याय देता येणार नाही. मराठी न शिकणार्‍या व न शिकवणार्‍या पिढ्या निर्माण करण्याचं पाप महाराष्ट्र राज्य यापुढे सहन करणार नाही. ‘‘महाराष्ट्र नवनिर्माण सेना’’ या प्रकारचा महाराष्ट्रद्रोह खपवून घेणार नाही. मग आपण जगातल्या कुठल्याही शाळेची शाखा महाराष्ट्रात आणलेली असेल किंवा त्याचा इतर अभ्यासक्रम कितीही वैशिष्ट्यपूर्ण असेल! मला वाटतं, आपल्या वैशिष्टपूर्ण अभ्यासक्रमात आमची महाराष्ट्राची राजभाषा मराठी समाविष्ट केल्याने काही फार बोजा आपल्या संस्थेवर पडणार नाही. शिवाय मराठीला ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांचा विरोध वैगरे असेल त्यांची यादी आमच्याकडे आपण पाठवू शकता. म्हणजे महाराष्ट्रात नेमके मराठीद्रोही किती राहतात ते सुद्धा आम्हाला कळेल! 

आपण विद्यादानासारख्या पवित्र कामात गुंतलेले असल्याने हे पत्र मी आपणास अत्यंत सौम्य भाषेत लिहिलेले आहे. वास्तवात याबाबतच्या समस्त मराठी बांधवांच्या भावना अतिशय तीव्र आहेत. त्या आपल्यापर्यंत त्या स्वरूपातच पोचवाव्या लागू नयेत हीच सदिच्छा. आशा आहे की, आपल्या संस्थेच्या सर्व प्रकारच्या सर्व शाळांमध्ये मराठी भाषा पहिली ते दहावी (समकक्ष ग्रेडनुसार) अनिवार्य करण्याचे पाऊल आपण तात्काळ उचलाल. अन्यथा लवकरच महाराष्ट्र नवनिर्माण सेना खास मराठी पद्धतीने आपल्याशी संपर्क करेल.

जय महाराष्ट्र!

आपला नम,
राज ठाकरे.

पुढे वाचा

जनमताच्या विकास कल्पना

पुढे वाचा

जनमताच्या विकास कल्पना

पुढे वाचा

जनमताच्या विकास कल्पना

पुढे वाचा

जनमताच्या विकास कल्पना

पुढे वाचा

जनमताच्या विकास कल्पना

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मुख्यालय.

दुसरा मजला, मातोश्री टॉवर्स, पद्माबाई ठक्कर मार्ग, माटुंगा (पश्चिम), मुंबई, महाराष्ट्र, ४०००१६ .

© २०२३ सर्व हक्क आरक्षित. महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मध्यवर्ती कार्यालय.