हिंदवी स्वराज्याचा शिवसूर्योदय !
| लेखक : श्री. राज ठाकरे
शेकडो वर्षे परकीय आक्रमकांनी आपल्या मनगटात दास्यत्वाच्या बेड्या अडकवल्या होत्या. या बेड्या ज्यांनी तोडून, मोडून टाकल्या आणि आपल्याला स्वत्वाची जाणीव दिली, इतकंच नाही, तर आपल्याला ओळख दिली, ते छत्रपती शिवाजी महाराज! भारतीय इतिहासातील मध्ययुग इस्लामच्या वर्चस्वाचं. हे वर्चस्व तयार झालं होतं निव्वळ धर्मवेडाच्या बळावर. या धर्मवेडातून उभ्या राहिलेल्या वर्चस्वानं हिंदू मनाला क्लेश होतील, अशा असंख्य घटना घडल्या. त्या मध्ययुगीन इतिहासाच्या पानापानांत सापडतील; पण १६३०मध्ये एक युगपुरुष जन्माला आला. ज्या युगपुरुषानं हिंदू मनांना पुन्हा ताठ मानेनं उभं केलं, ज्या नावाच्या जयघोषानं केवळ तेव्हाच नव्हे, तर आजदेखील हिंदू भारतीय मन चेतून उठतं, ते आपले छत्रपती शिवाजी महाराज.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३४९ वर्षं पूर्ण होऊन साडेतीनशेवं वर्षं सुरू होत आहे. वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी फत्तेखानाविरोधात लढाईला निघालेले महाराज, अफझलखानाच्या वधाला महाराज निघाले; तेव्हा त्यांचं वय होतं अवघं तिशीचं. हे आवर्जून सांगण्याचं कारण इतकंच, की इतक्या लहान वयात हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघायचं, त्यासाठी एका मागोमाग एक मोहिमा आखायच्या, त्यासाठी काटेकोर नियोजन करायचं आणि प्रत्येक मोहिमेत यश येऊ दे की अपयश, मन कुठंही विचलित न होऊ देता, पुन्हा पुढच्या योजनेवर काम करायचं, हे सगळं कुठून आलं असेल? खरंच मानवी आकलनापलीकडचं हे सगळं आहे.
वयाच्या अवघ्या चव्वेचाळिसाव्या वर्षी स्वतःला राज्याभिषेक करवून घेताना महाराजांच्या मनात काय विचार आले असतील, याची कल्पना करणंच कठीण आहे; कारण हा काही साधासुधा राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची निर्मिती हे आपले जीवित कर्तव्य आहे, हीच ईश्वरी इच्छा आहे आणि या इच्छेचे आपण ईश्वराने नेमलेले कर्ते आहोत, हे भान असणाऱ्या एका राजानं करून घेतलेला हा राज्याभिषेक होता.
ही एका घराण्याच्या राजगादीची स्थापना नव्हती, तर तेव्हा त्रासलेल्या सर्व हिंदू मनांना आपलं सार्वभौम राज्य असावं, ही प्रेरणा ज्या घटनेनं दिली, ती घटना म्हणजे राज्याभिषेक सोहळा होता. या राज्याभिषेकायोगे महाराजांनी मुघल आक्रमकांच्या विरोधातील एक जाहीरनामाच घोषित केला. त्याचे पडसाद पुढं अगदी थेट आसाम, बंगालपर्यंत उमटले. मऱ्हाठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार गेला; पण त्याची बीजं महाराजांच्या राज्याभिषेकात आहेत, हे विसरून चालणार नाही. इतकंच काय, पुढं ब्रिटिशांच्या विरोधात ज्या प्रांतांनी सर्वप्रथम आवाज उठवला, त्यातला महाराष्ट्र हा एक प्रांत होता आणि येथील तेव्हाच्या सगळ्या नेतृत्वाची प्रेरणा ही छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्यच होती.
या राज्याभिषेक सोहळ्यानंतर महाराजांनी ‘राज्याभिषेक शक’ ही कालगणना सुरू केली. ‘शिवराई’ आणि ‘होन’ ही नवी नाणी चलनात आणली. मराठी भाषेच्या संवर्धनासाठी महाराजांनी ‘लेखनप्रशस्ती’ आणि ‘राज्यव्यवहारकोश’ हे ग्रंथ लिहून घेतले. या सगळ्या घटना साध्या नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याचं साडेतीनशेवं वर्षं सुरू होणं, हा फक्त उत्सव म्हणून साजरा करायचा, याला काही अर्थ नाही. ही फक्त महाराष्ट्राचीच नाही, तर देशाच्या इतिहासातील महत्त्वाची घटना आहे, हे मुळात आपल्याला आधी पटलं पाहिजे. एकदा हे पटलं, की मात्र नेहमीप्रमाणे कुठलाही न्यूनगंड न बाळगता हे आपण देशाला आणि जगाला ओरडून सांगितलं पाहिजे.
महाराजांनी राज्याभिषेक करून हिंदवी स्वराज्याच्या गादीला अधिष्ठान दिलंच नसतं तर काय झालं असतं, असा विचार माझ्या मनात अनेकदा येऊन जातो. राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना, प्रतापराव गुजरांसारखा अत्यंत निष्ठावान मोहरा महाराजांनी गमावला होता. अशा वेळेस वयाच्या अवघ्या ४४व्या वर्षी एक युगप्रवर्तक कृती करायची, हे सोपं नाही. समजा महाराजांनी राज्याभिषेक करून घेतलाच नसता, तर पुढं पार अटकेपार पोहोचलेल्या मऱ्हाठा साम्राज्याला अधिष्ठान कुठून मिळालं असतं? अगदी सोमनाथ ते काशीविश्वेश्वराच्या मंदिरांचा जीर्णोद्धार ज्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाईंनी केला, त्यांना तरी प्रेरणा किंवा अधिष्ठान कुठं व कसं मिळालं असतं? स्वकीयांचं राज्य या कल्पनेसाठी पुढं १५० वर्षं ब्रिटिशांच्या विरोधात जो लढा सुरू होता, त्या लढ्याला खरंच स्वकीयांचं राज्य म्हणजे काय, याचं उदाहरण तरी कोणतं होतं? अगदी आत्ताचं उदाहरण घ्यायचं झालं, तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यासाठी आख्खा महाराष्ट्र एकवटला होता, तो अन्याय झाला तर तो सहन करू नका, या महाराजांच्या शिकवणीतूनच.
संयुक्त महाराष्ट्रासाठीच्या लढ्याची प्रेरणादेखील छत्रपती शिवाजी महाराज आणि राज्याभिषेकाद्वारे त्यांनी स्थापन केलेलं हिंदवी स्वराज्य हीच होती. महाराज हे काही वारसाहक्कानं गादीवर बसले नव्हते. त्यांनी स्वराज्य निर्माण केलं होतं आणि त्याच गादीवर ते बसले होते; त्यामुळं राज्याभिषेकाच्या घटनेकडं मी पुन्हा म्हणतो, तसं निव्वळ उत्सव म्हणून बघू नये.
साडेतीनशेव्या राज्याभिषेक वर्षाच्या निमित्तानं सरकारी कार्यक्रमांची रेलचेल असेल ती असू दे; पण आपण सकल मराठी जन या क्षणाचा जयघोष करणार आहोत का? जगाला ओरडून सांगणार आहोत का? आणि यातून प्रेरणा घेणार आहोत का? हा सोहळा साजरा होईल, हे उत्तमच आहे; पण उद्या आपण जगाला ओरडून आपल्या राजाबद्दल सांगणार असू आणि जग त्याची दखल घेणार असेल, तर या राजानं बांधलेल्या गडकिल्यांचं पुनरुज्जीवन करण्याची हीच वेळ नाही का? मी जे महाराजांच्या पुतळ्याबद्दल बोललो होतो, त्याचा विपर्यास केला गेला. एक अश्वारूढ पुतळा कधी उभा राहील माहीत नाही. त्यासाठी हजारो कोटी रुपये खर्च करण्यापेक्षा, त्यातूनच गडकिल्ल्यांचं संवर्धन झालं, तर काय वाईट आहे?
बाबासाहेब पुरंदरेंचं एक खूप छान वाक्य आहे, ‘परदेशात त्यांच्या महापुरुषांचे पुतळे उठसूट बघायला मिळत नाहीत; कारण ते महापुरुष, त्यांचे विचार त्यांच्या रक्तात सामील झालेले असतात. आपल्याकडं महापुरुष, त्यांचे विचार आपल्या धमन्यांमध्ये सळसळत नाहीत, म्हणून आपल्याला जागोजागी पुतळ्यांची गरज लागते.’ हे चित्र बदलण्यासाठी प्रत्येकाच्या मनात, रक्तात शिवाजी महाराज आणि त्यांचे विचार सामील झाले, तरच महाराष्ट्राचं गतवैभव पुन्हा एकदा प्राप्त होईल.
महाराजांनी अठरापगड जातीच्या लोकांना एकत्र करून स्वराज्याचं स्वप्न पाहिलं. त्या महाराजांच्या राज्यात जातीजातींत विष कालवून, स्वतःच्या राजकारणाची पोळी भाजून घेणं सुरू आहे. राज्याभिषेक सोहळ्याच्या निमित्तानं हे सर्व कायमचं बंद करण्याचा निर्धार महाराष्ट्र करणार आहे का? रोज सकाळी उठून कोणावर तरी कोणी तरी चिखल फेकायचा आणि वाहिन्यांवर झळकायचं, वर्तमानपत्रांचे रकाने यानंच भरायचे, याऐवजी सामान्य माणसाच्या प्रश्नांविषयी बोलून, त्यासाठी सरकारवर दबाव आणून, महाराजांच्या काळातील गतवैभव परत आणण्याची शपथ आपण सगळे घेणार आहोत का? हे सगळं करणार असू, तरच या सोहळ्याला अर्थ आहे; अन्यथा हा एक उत्सव होईल. ज्ञानेश्वर महाराज असोत, की छत्रपती शिवाजी महाराज असोत ही माणसं अलौकिक होती. इतक्या लहान वयात इतकी प्रतिभा घेऊन ती कशी आली, हे खरंच आकलनाच्या पलीकडचं आहे. अशी प्रतिभावान माणसं या मराठी मातीत जन्माला आली याचा अर्थ इतकाच, या भूमीचं भलं व्हावं आणि तिनं देशाला दिशा दाखवावी, हीच ईश्वरी इच्छा असावी.
म्हणूनच, या ऐतिहासिक क्षणाच्या निमित्तानं तमाम मराठी जनांनी एकत्र येत, सर्व मतभेद बाजूला ठेवून, निव्वळ महाराजांनी दिलेल्या विचारांचा वारसा आपण कसा जपू शकतो, वाढवू शकतो याचा विचार करणं आणि अर्थात कृती करणं, हेच खरं ‘साजरं करणं’; बाकी सगळा उपचार व मिरवणं. असो माझ्या महाराष्ट्रातील जनतेला शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र!
। श्री. राज ठाकरे ह्यांचा हा लेख ३५० व्या शिवराज्याभिषेकाच्या पार्श्वभूमीवर दि. ४ जून २०२३ ‘महाराष्ट्र टाइम्स’च्या विशेष अंकात प्रसिद्ध झाला होता.