loader image
Select Page

महाराष्ट्र नवनिर्माण सेना । गुढीपाडवा मेळावा २०२३ : सन्मा. राजसाहेबांच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे :

 • ‘संपेलला पक्ष’ म्हणून हिणवणाऱ्यांनी शिवतीर्थावरचा जनसमुदाय पहावा. जे असं बोलले होते त्यांचं काय झालं हे महाराष्ट्राला माहित आहे.
 • शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण नक्की कोणाचं, तुझं की माझं ह्यावर रस्सीखेच सुरु होती ते पाहताना मला त्रास होत होता. ‘शिवसेना’मी लहानपणापासून जगलो. दुसरीत असल्यापासून शर्टाच्या खिशावर, हृदयाच्या जवळ शिवसेनेचा वाघ अभिमानाने मिरवायचो.
 • शिवसेना सोडताना मला वेदना झाल्या. मी शिवसेना सोडताना म्हणलं होतं की, “माझा वाद विठ्ठलाशी नाही तर आजूबाजूच्या बडव्यांशी आहे. आणि हीच चार टाळकी शिवसेनेला अडचणीत आणणार. मला त्याचं वाटेकरी व्हायचं नाही.”
 • पक्ष स्थापनेच्या वेळेस, खरंतर मी शिवसेना का सोडली ह्यावर बोललो असतो. पण मी बोललो नाही. शिवसेना सोडताना ज्या अफवा उठवल्या की मला शिवसेनाप्रमुखपद हवं होतं. साफ झूट. शिवसेना हे शिवधनुष्य आहे ते फक्त बाळासाहेबांनाच पेलवू शकतं. एकाला पेलवलं नाही, दुसऱ्याला पेलवेल की नाही कळेलच.
 • शिवसेना सोडताना नक्की काय झालं हे मला तुम्हाला सांगायचं आहे. जे सांगतोय, शिवछत्रपतींची शपथ घेऊन सांगतो. मी उद्धव ठाकरेंना बसवून एकदा विचारलं, “तुला काय हवं आहे, पक्षप्रमुखपद? तर घे.. सत्ता आली तर मुख्यमंत्रीपद हवं आहे? तेही घे निर्धास्त पण मला माझा रोल काय आहे ते सांग…!”
 • मी सांगितलं की मला फक्त प्रचाराला बाहेर काढायचं असं करू नका.. उद्धव म्हणाले की मला काहीच नको आहे. आम्ही बाळासाहेबांकडे गेलो आणि सांगितलं की सगळं नीट झालं आहे. बाळासाहेब अधीर होते उद्धव ना भेटायला पण ते बाळासाहेबांच्या समोर आलेच नाहीत. कारण उद्धवना शिवसेनेत आम्ही नको होतो.
 • नारायण राणेंना शिवसेना सोडायची नव्हती. मी मध्यस्थीचा प्रयत्न केला, मी नारायण राणेंशी बोललो, बाळासाहेबांची भेट घडवून आणायचा प्रयत्न केला. पण बाळासाहेब आणि राणेंची भेट जी घडवून आणायचा जो मी प्रयत्न करत होतो ती भेटसुद्धा घडू दिली गेली नाही.
 • शिवसेनेच्या बाबतीत जे घडलं त्याने मला त्रास झाला. मला बाळासाहेबांसमोर पक्ष काढायचा नव्हता, माझी कसलीच महत्वकांक्षा नव्हती.
 • माननीय बाळासाहेब असते तर गेल्या अडीच वर्षांत जे घडलं ते घडलंच नसतं. २०१९ च्या विधानसभेला शिवसेना आणि भाजपने एकत्र निवडणूक लढवली, लोकांनी ह्यांच्या युतीला सत्तेत येण्यासाठी मतदान केलं. आणि अचानक उद्धव ठाकरेंनी अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद मागितलं..
 • अमित शाह ह्यांनी चार भिंतीत आश्वासन दिलं असं उद्धव ठाकरे म्हणाले, मग नरेंद्र मोदी आणि अमित शाह पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ह्यांचं नाव पुढचे मुख्यमंत्री म्हणून घेत होते तेंव्हा का नाही आक्षेप घेतलात ? आपल्याशिवाय सत्ता बसत नाही हे पाहून मुख्यमंत्रीपदाची मागणी रेटली.
 • मुख्यमंत्री पद मिळवायचं म्हणून काँग्रेस-राष्ट्रवादी ह्या दोन पक्षांच्या विरोधात निवडणूक लढवली आणि त्यांच्याच मांडीत जाऊन बसले. अजित पवार-फडणवीस एका पहाटे उठतात आणि शपथ घेतात. काय चाललंय महाराष्ट्राच्या राजकारणात?
 • उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदात मश्गुल होते, आमदारांना भेटायचे नाहीत. मग ४० आमदार कंटाळून सोडून गेले. मग २० जून २०२२ ला सुरत-गुवाहाटी-गोवा प्रवास झाला. महाराजांनी सुरतेची लूट करून आणली आणि हे इथे लूट करून सुरतेला गेले.
 • माझं एकनाथ शिंदेंना सांगणं आहे की तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहात, तुम्ही जनतेची कामं करा. महाराष्ट्रासमोर अनेक प्रश्न आहेत, त्याकडे लक्ष द्या. त्यांच्या मागे सभा घेत बसू नका. त्यांनी वरळीत सभा घेतली, की शिंदेनी घेतली वरळीत सभा घेतली. खेडमध्ये सभा घेतली घेतली शिंदेनी खेडनमध्ये सभा. थांबवा हे !
 • सुशोभीकरणाच्या नावाखाली पैशाची उधळपट्टी थांबवा. आज बेरोजगारी वाढत आहे, शेतकरी अडचणीत आहेत. ह्या प्रश्नांसाठी जनता सरकारकडे बघत आहे आणि सरकार कोर्टाकडे बघतंय. असं सरकार मी नाही पाहिलं !
 • राजकारणाचा सगळा जो चिखल करून ठेवला आहे त्यावर माझं तर मत आहे एकदा आताच निवडणूका घ्या आणि जनतेला ठरवू द्या. मतदार राजकारणाचा चिखल करणाऱ्यांच्या तोंडात शेण शेण घालेल… काय तो एकदाचा सोक्षमोक्ष लागू दे.
 • मला धर्मांध हिंदू नको, मला धर्माभिमानी हिंदू हवा आहे. मला मुसलमान पण माझ्या सोबत हवा आहे पण तो मुसलमान जावेद अख्तर ह्यांच्या सारखा मुसलमान हवा. असा मुसलमान जो पाकिस्तानात जाऊन त्यांना २६/११ च्या हल्ल्यांबद्दल कडक शब्दांत सुनावण्याची हिंमत ठेवतो.
 • मध्यंतरी एक पत्र आलं… सांगली, कुपवाड येथून. इथल्या रहिवाश्यांनी लिहिलं आहे, “हा भाग हिंदुबहुल आहे. इथल्या एका मोकळ्या जागेवर मुसलमानांनी अतिक्रमण केलं, आम्ही विरोध केला तर आम्हाला धमक्या दिल्या, त्रास दिला, ह्यावर पोलिसांनी दखल घेतली नाही; तिथे मशीद बांधली जात आहे.” ह्या अनधिकृत बांधकामावर कारवाई व्हायलाच हवी.
 • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सत्तेत आल्यावर त्यांनी प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजल खानाची पसरलेली कबर पुन्हा जागेवर आणली. ह्याबद्दल सरकारचं अभिनंदन.
 • एकनाथ शिंदेकडे आता शिवसेना हे नाव आलं, धनुष्यबाण चिन्हही घेतलंत. त्यात तुम्ही म्हणता आमच्यावर बाळासाहेबांच्या विचारांचा प्रभाव आहे तर माझी एकनाथ शिंदेंना विनंती आहे की आता तुम्ही सत्तेत आहात, तुम्ही आता मशिदींवरचे भोंगे उतरवा. तुम्हाला जमणार नसेल तर आमच्या कृतींकडे दुर्लक्ष करा. मशिदींवरचे भोंगे आम्ही उतरवून दाखवू.
 • अजून एक आवाहन आहे कि एकनाथ शिंदेंना माझं आवाहन आहे की, मशिदींवरच्या भोंग्यावरच्या आंदोलनाच्या वेळी मागच्या सरकारने माझ्या १७००० महाराष्ट्र सैनिकांवर गुन्हे दाखल केलेत, ते गुन्हे मागे घ्या.
 • सरकारचं/प्रशासनाचं दुर्लक्ष झाल्यावर काय होतं ते आता बघूया… माहीमच्या मगदूम बाबा दर्ग्याच्या इकडे समुद्रात हे अनधिकृत बांधकाम केलं. २ वर्षांपूर्वी हे काहीच नव्हतं. इथे नवीन हाजीअली तयार करणं सुरु आहे. दिवसाढवळ्या हे सुरु आहे, आणि तरीही पोलीस, महापालिका ह्यांना दिसलं नाही?
 • माझी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री/गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबई पोलीस आयुक्त विवेक फणसळकर ह्यांना विनंती आहे की हे पाहल्यावर तात्काळ कारवाई करा, हे अनधिकृत बांधकाम तोडा. अन्यथा तिथे आम्ही मोठं गणपतीचं मंदिर उभं करू. आता जे होईल ते होईल.
 • देशातील राज्यघटना मानणाऱ्या मुसलमानांना मला विचारायचं आहे की, हे तुम्हाला मान्य आहे का? आम्हाला ताकद दाखवण्याची इच्छा नाही पण गरज पडली तर ताकद दाखवायला आम्ही मागे पुढे पाहणार नाही.
 • माझी तमाम हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की येणारी रामनवमी जोरदार साजरी करा. येत्या ६ जून २०२३ ला छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला ३५० वर्ष पूर्ण होत आहेत. त्यावेळेला मी स्वतः रायगडावर जाणार आहे. तुम्ही पण या. आणि हिंदू बांधवांना विनंती आहे की, ‘दक्ष रहा.’